Thursday, 11 June 2020

II विठुराया II

II विठुराया II
















अवसेची छाया I होती जन्मांतरी
झाला तू कैवारी I तेंव्हा देवा  II१II

प्रपंचाची वीट I तूचि केली नीट
तरी नाही धीट I मन देवा II२II

तूचि दिले देवा I कर्म अर्थ दाम 
आणि तुझे नाम I पामरासी II३II

पायरीसी राहू I की शिखरास जाऊ
सांगा कुठे पाहू I विठु राया II४II

ऐलतिर मोह I पैलतिर माया
मधोमध काया I फसली गा II५II

पुन्हा कुरु क्षेत्री I दाव तुझे रुप
देहाचाच धूप I अर्पितो मी II६II

पडू द्या हो कानी I पांचजन्य घोष 
मिटो सारा दोष I समूळची II७II

कष्टाचेच हाथ I कर्माचीच ओढ
आणि तुझे वेड I असू द्यावे II८II

ब्रम्हा पुजारी
१६ फेब्रुवारी २०२०

पावसाळा

Friday, 28 July 2017

कुंजरगड-आजोबा-कात्राबाई

कुंजरगड-आजोबा-कात्राबाई



या वेळी प्रसाद ने अगदी भन्नाट प्लॅन  आखला . कुंजरगड-आजोबा-कात्राबाई च्या छत्रछायेमध्ये पायपीट करायचे ठरले आणी बघता बघता २२-२३ जणांचा जथ्था तयार झाला. आकाराने मोठा असलेल्या ह्या नगर जिल्ह्याने किती गडकोट आणि घाटवाटा व्यापल्या आहेत हे कदाचित् स्वतः ला खास "नगरी " म्हणवून घेणाऱ्या अव्वल लोकांना ही सहजासहजी कळेल असे वाटत नाही !!! असो .नेहमी प्रमाणे नेतृत्व प्रसाद ने स्विकारले असल्यामुळे ह्या वेळी देखील इतर गोष्टींची दगदग झाली नाही ,आमची गाडी भल्या पहाटे अंदाजे ३.३० -३.४५ ला विहीर गावी पोहोचली . बाजूने वेढलेल्या उंचच उंच पर्वत रांगा आणी समोर " आ " वासून उभा ठाकलेला कुंजरगड लख्ख चंद्र प्रकाशात आम्हाला खुणावत होता. सुदैवाने थंडी देखील गुलाबीच होती आणी त्या मध्ये थोडीशी झोप घेण्याची छान अशी संधी आम्हाला मिळाली . पहाटे अंदाजे ६ वाजता योगीता आणी इतर धडपड्या लोकांनी कधी उठुन आमच्या साठी पोहे बनविले हे देखील कळाले नाही . सकाळचे सोपस्कार उरकून चहा पोह्यावर ताव मारुन आणी वाटाड्या ला सोबत घेउन आम्ही अंदाजे ७ वाजता गडाच्या दिशेने निघालो. सुरवातीला  १५-२० 

Thursday, 27 July 2017

संवेदना

उद्वेग आणि आवेष सारा
दावीते संवेदना
कर्तव्य कर्माची प्रचीती 
घडविते संवेदना

प्रेम सा-या जगतातले
स्विकारते संवेदना
द्वेष सा-या दुनीयेतला
धीःकारते संवेदना 

कल्लोळ सा-या वेदनांचा
पळवीते संवेदना
बंध आणि  भाव सारा
मिळवीते संवेदना

राघवाची पायरी 
कवटाळीते संवेदना 
माधवाची बासरी 
छेडीते संवेदना 

हर्ष आणि  क्लेश सारे 
जाणीते संवेदना
तुमच्या मध्ये माझ्या मध्ये 
विसावीते संवेदना

ब्रम्हा पुजारी 
१२.०५.२०१७

मी देव पाहिला

मी मना मनात देव पाहिला
जनजनात देव पाहिला 
कर्तव्य कर्मात देव पाहिला
होय मी देव पाहिला

मी घरा-घरात देव पाहिला
तुळशी रांगोळीच्या दारात पाहिला
सुखी संसारात देव पाहिला
होय मी देव पाहिला

बापाच्या करड्या नजरेत देव पाहिला
आईच्या मायेच्या कुशीत देव पाहिला
गुरूच्या  कठोर शिक्षेतही देव पाहिला
होय मी देव पाहिला 

मी सुंदर सृष्टीत देव पाहिला
मोहक पुष्प वृष्टीत देव पाहिला
पर्जन्य वृष्टीतही देव पाहिला
होय मी देव पाहिला

मी खळाळत्या झऱ्यात देव पाहिला
कधी वादळ वाऱ्यात देव पाहिला
उंच डोंगर दर्यात देव पहिला
होय मी देव पहिला

मी सगुण साकारात देव पहिला
निर्गुण निराकारात देव पाहिला
ध्यान मंदिरातही देव पाहिला
होय मी देव पाहिला

मी संत वचनात देव पाहिला
वेद वाणीत देव पाहिला
नाम स्मरणातही देव पाहिला
होय मी देव पहिला

जळी- स्थळी काष्ठी पाषाणी
मी फक्त देव पाहिला, मी देव पाहिला
होय मी देव पाहिला, मी देव पाहिला

ब्रम्हा पुजारी २० मे २०१७

गरीब शेतक-याचे मनोगत

बांधावरचा द्वेष नको 
मज हिरवेगार शेत हवे 
तंटा नको अन् तोटा नको
मज माणुसकीचा न्याय हवा  

बळी राजाचा बळी नको 
मज बळी राजाचे राज्य हवे 
सुजलाम् सुफलाम् जननी हवी 
मज धडधाकट नव राष्ट्र हवे 

फास नको गळफास नको 
जगण्याची नीत आस हवी
कथा नको अन् व्यथा नको 
घामाचे मज मूल्य हवे 

लेक लाडकी तुमची आमुची
भ्रूणहत्येचे मज पाप नको 
अद्न्यानाची रास नको 
मज द्न्यानाची आरास हवी   

भार नको आभार नको
जनकल्याणाचे सार हवे
अंधाऱ्या गावात मला
लखलखत्या दिव्यांचे गीत हवे

खिलाराची मज जोड हवी
मज लेकुरवाळी गाय हवी
दुधाचा मज महापूर हवा
चेहऱ्यावर सारा नूर हवा

पैसे नको मज पाणी हवे
भीक नको मज पीक हवे
धरणात हरविलेले गाव हवे 
मज कर्जात गेलेले शेत हवे 

धानास माझ्या भाव हवा 
दरबारी तुमच्या मज मान हवा
स्वातंत्र्याच्या सत्तरीत तरी
मज सुराज्याचा नव सूर्य हवा !!!

ब्रम्हा पुजारी
०२.०५.२०१७

स्वर्गीय काश्मीर



गुलमर्ग सुंदरी मी ,मीच सोनमर्ग परी 
हिमराशींच्या सरी, नित्य माझ्या दारी
दैत्यहारी जटाधारी आहे माझा हरी
माझीया उदरात वसविली शिवपंढरी
होय मी कश्मीरी ,मी निसर्ग सुंदरी

मी सप्त सिंधु ..मी माता देवकी
सोशीते विरह कळा..मी देवी जानकी
माझ्याच अंगणात ,आज मी पोरकी
माझ्याच सदनात जाहले मी बंधकी
होय मी कश्मीरी ,मी जगत् सुंदरी...

मी झेलम, मी खळाळती लंबोदरी
जाहले मी आज, उध्वस्त अवंतीपुरी
आजवरी आनंदे झेलील्या हिमसरी 
झेलते मी आज,जहरी बंदुकांच्या फैरी
होय मी कश्मीरी,मी हिमसुंदरी

मी निसर्ग सुंदरी, मी विश्वसुंदरी
मी केशर कस्तुरी, मी स्वप्न सुंदरी
ये ईथे तू ,ऐक माझी व्यथा सारी 
दे पुनश्च मजला, ती दुनीया न्यारी 
होय मी कश्मीरी,मी नित्य नवसुंदरी !!!

©ब्रम्हा पुजारी

Wednesday, 26 July 2017

काळ्या आईच्या पदरांत

कर्तृत्व पताका घेऊनिया हातात
निघावे दिगंतरी अज्ञाताच्या शोधात !
घ्यावी भरारी उंच आकाशात
मगच परतावे उबदार घरट्यात !
विसरावे 'मी' पण विश्वाच्या दारात
भाव समर्पण चेतवावा मनात !
तुडवाव्या खडतर वाटा गुरु च्या शोधात
काया-वाचा रित्या व्हाव्या आंनदवनभुवनात !
सप्तसुर छेडावे टिपूर चांदण्यात
अतरंगी लीन व्हावे देह-हृदय मंदिरात !
अपूर्णत्वाची जाणीव पूर्णत्वाच्या दारात
अंती घ्यावा विसावा काळ्या आईच्या पदरांत !

© ब्रम्हा पुजारी 

Sunday, 23 July 2017

लिंग्या घाट-कुर्डुगड-निसणीची वाट




पुणेहून लवासा मार्गे दासवे गावापासून अंदाजे १६-१७ किलो मीटर वर धामण ओहोळ हे गाव आहे . ह्या भागातील जास्त पर्जन्यवृष्टीचा हा भाग ओळखला जातो. वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर ह्या जबाबदार आणि व्यावसायिक गिरिप्रेमी संस्थेने मागील रविवारी १६ जुलै रोजी येथील भटकंती अरेंज केली होती. प्रसाद आणि प्रसन्न हे दोघेही वाघ बंधू आम्हाला नेहमीच सह्याद्रीच्या पोटात शिरून त्याची विविधरूपे दाखविण्यास सज्ज असतात . ह्या वेळी प्रसन्न ने धुरा खांद्यावर घेतली आणि आम्ही सारे सह्याद्रीचे वारकरी त्याच्या मागे मागे धावलो.