Sunday, 23 July 2017

लिंग्या घाट-कुर्डुगड-निसणीची वाट




पुणेहून लवासा मार्गे दासवे गावापासून अंदाजे १६-१७ किलो मीटर वर धामण ओहोळ हे गाव आहे . ह्या भागातील जास्त पर्जन्यवृष्टीचा हा भाग ओळखला जातो. वाइल्ड ट्रेक ऍडव्हेंचर ह्या जबाबदार आणि व्यावसायिक गिरिप्रेमी संस्थेने मागील रविवारी १६ जुलै रोजी येथील भटकंती अरेंज केली होती. प्रसाद आणि प्रसन्न हे दोघेही वाघ बंधू आम्हाला नेहमीच सह्याद्रीच्या पोटात शिरून त्याची विविधरूपे दाखविण्यास सज्ज असतात . ह्या वेळी प्रसन्न ने धुरा खांद्यावर घेतली आणि आम्ही सारे सह्याद्रीचे वारकरी त्याच्या मागे मागे धावलो.



धामण ओहोळ वरून अंदाजे २० मिनिटांची पायपीट केल्यानंतर डोंगर उतारावरून खडकाळ मार्गाने खाली उतरायला सुरुवात केली हा कोकणात उतरणारा पूर्वापार रस्ता आहे असे म्हणतात . उतरताना दोन डोंगरांच्या मधोमध एक शिवलिंगाच्या आकाराचा भला मोठ्ठा सुळका दिसतो त्या मुळेच ह्याला लिंग्या घाट म्हटले जाते असे समजले . खाली उतरत असताना वरून कोसळणारा धबधबा अंगावर शहारे आणतो . येथेच कुठेतरी नैसर्गिक गुहा आहेत असे ऐकले आहे . ह्याच्या पुढे जंगलातून साधारणपणे अर्धातासभर काळजीपूर्वक पायपीट केल्यानंतर डावीकडून दुसरी वाट येऊन मिळते ह्याला निसणीची वाट म्हणतात . ह्या वाटेने वर गेल्यावर लवासा हिल च्या मुंबई पॉईंट वर पोहोचता येते. आम्ही सरळ पुढे कुर्डुगड च्या दिशेने निघालो. सुंदर नयनरम्य परंतु तुलनेने अपरिचित अशी वाट , खळाळते झरे उंचच उंच डोंगर रांगांचा परिसर पार करीत कुर्डुगड पायथ्या पर्यंत पोहोचता येते . येथे एक छोटेसे मंदिर आहे आणि मंदिरात शाळा देखील भरत असावी कारण येथे १०'-१२' च्या मंदिरात दोन काचेचे फळे ,दोन खुर्च्या एक लोखंडी पेटी ,काही नकाशे आणि सोबत सरदार भगतसिंग ,गांधीजी आणि विवेकानंद देखील त्या छोटेखानी देवळात विराजमान दिसले . हे गाव रायगड जिल्ह्यातील माण तालुक्यात लागते असे कळाले. एव्हाना पाऊस आणि वारा जोर धरू लागला होता आणि आम्ही २०-२५ जण गडाच्या रोखाने निघालो. हा गड आणि परिसर सरदार/सेनापती पासलकर यांच्या कार्यकक्षेत येत होता असे सोशल मीडियावर शोधल्यावर कळाले. सध्याची गडाची दुरावस्था महााराष्ट्राच्या गरीब शेतगड्या सारखीच झाली आहे . एवढे मोठे वैभव इतिहास जमा झाल्यावर शेवटच्या खाणाखुणा हृदयाला नकळत चिरा पाडून जातात !




आम्ही तसेच वर निघालो , वाऱ्या पावसाच्या सगंतीने गडाने आम्हाला अलगद पोटाशी घेतले , सावकाश पावले टाकत डाव्या बाजूची दरीकडील बाजू लक्ष देऊन पार केली आणि तेथे कदाचित शतकांपासून उघड्यावर एका खडकावर कोरलेले हनुमंत आम्हाला दर्शन देण्यासाठी सज्ज दिसला. ज्याने ही मूर्ती घडविली तो कलाकार आणि ज्याच्या प्रेरणेने आणि भक्तीने ही मूर्ती साकारली त्या हनुमंत भक्ताचा आत्मा आज त्या मुर्तीची परिस्थिती पाहून नक्कीच तळमळत असणार ! .हनुमंताची मूर्ती योग्य जागी हलविणे शक्य नव्हते म्हणून आम्हीच दर्शन घेऊन पुढे हललो. असो

आणखीन वर गेल्यावर किमान ५०० लोक मावतील एवढी अजस्त्र नैसर्गिक गुहा आम्हाला कवेत घेण्यास सज्ज होती . थोडेसे फोटो सेशन करून आम्ही गडाला वळसा घातला आणि शेवटच्या टप्प्यात पोहोचलो. उध्वस्त मन आणि उध्वस्त बुरुज मला नेहमीच सम दुःखी वाटतात ते वेळीच कणखर केले नाहीत तर वैचारिक आणि शक्तीशाली वारसा जपणे नेहमीच अवघडच होत रहाणार आहे. येणाऱ्या संकटाना तोंड देण्यास उभा असणारा तो बुरुज आज शेवटची घटिका मोजतोय ! हे बुरुज , ह्या घाटवाटा हे अगणित किल्ले , भाले , ढाली तलवारी यांच्यावर प्रेम केल्याशिवाय आणि उज्ज्वल वारसा जपल्या शिवाय देशप्रेमाच्या साऱ्या गोष्टी माझ्या दृष्टीने तरी व्यर्थ आहेत. असो. ढासळत्या बुरुजाला वळसा घालून चिंचोळ्या वाटेने वर गेल्यावर तेथे निर्माण झालेली नैसर्गिक खिडकी दिसली तेथून पलीकडच्या दिशेने येणाऱ्यावर देखरेख ठेवण्यास ह्या खिडकी मुळे मदत होत असावी. आम्ही पुन्हा मागे फिरलो आल्या वाटेने खाली उतरून पायथ्याशी असलेल्या देव मंदिर आणि ज्ञान मंदिराच्या संगमावर आलो , एवढ्या पायपीटी नंतर सणकुन भूक लागली होती आणि प्रसन्न ने नेहमी प्रमाणे ह्या वेळीही चांगले जेवण आणि बुंदीचा लाडू देऊन आमची भूक शमविली. असो आल्या पावलांनी अर्धा तास उलटी पायपीट केल्यावर निसणीच्या वाटेच्या जंक्शन वर पोहोचलो आणि त्या वाटेने वर लवासा हिल च्या मुंबई पॉईंट वर येऊन पुन्हा धामण ओहोळ ची वाट धरली. ह्या वाटेने जाताना वाटाड्या सोबत असणे गरजेचे आहे. वाटाड्या मुळे आपल्या धैर्याला दिशा देण्याचे काम सोपे होते. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आमचा सुंदर आणि आडवाटेचा ट्रेक संपत आला होता पण आठवणींच्या ठेव्यात ती बिकट वाट, खळाळते झरे , उंचावरून कोसळणारा जल प्रपात, हिरवाईने नटलेली सृष्टी ,त्या घाट वाटा आणि कुर्डुगड अर्थात विश्राम गडावर चे ते क्षण कायमचा ठेवा बनून राहतील हे निश्चित।

 ©ब्रम्हा  पुजारी

Photo courtesy : Abhishek Srivastava Pramod Potdar Raghunath ShendeArjun Pawar Vinayak Sonmale and all other trekmates !

2 comments: