Friday, 28 July 2017

कुंजरगड-आजोबा-कात्राबाई

कुंजरगड-आजोबा-कात्राबाई



या वेळी प्रसाद ने अगदी भन्नाट प्लॅन  आखला . कुंजरगड-आजोबा-कात्राबाई च्या छत्रछायेमध्ये पायपीट करायचे ठरले आणी बघता बघता २२-२३ जणांचा जथ्था तयार झाला. आकाराने मोठा असलेल्या ह्या नगर जिल्ह्याने किती गडकोट आणि घाटवाटा व्यापल्या आहेत हे कदाचित् स्वतः ला खास "नगरी " म्हणवून घेणाऱ्या अव्वल लोकांना ही सहजासहजी कळेल असे वाटत नाही !!! असो .नेहमी प्रमाणे नेतृत्व प्रसाद ने स्विकारले असल्यामुळे ह्या वेळी देखील इतर गोष्टींची दगदग झाली नाही ,आमची गाडी भल्या पहाटे अंदाजे ३.३० -३.४५ ला विहीर गावी पोहोचली . बाजूने वेढलेल्या उंचच उंच पर्वत रांगा आणी समोर " आ " वासून उभा ठाकलेला कुंजरगड लख्ख चंद्र प्रकाशात आम्हाला खुणावत होता. सुदैवाने थंडी देखील गुलाबीच होती आणी त्या मध्ये थोडीशी झोप घेण्याची छान अशी संधी आम्हाला मिळाली . पहाटे अंदाजे ६ वाजता योगीता आणी इतर धडपड्या लोकांनी कधी उठुन आमच्या साठी पोहे बनविले हे देखील कळाले नाही . सकाळचे सोपस्कार उरकून चहा पोह्यावर ताव मारुन आणी वाटाड्या ला सोबत घेउन आम्ही अंदाजे ७ वाजता गडाच्या दिशेने निघालो. सुरवातीला  १५-२० 
मिनीटे सरळ पायपीट केल्यावर हळूहळू दाट झाडी आणि चढण सुरु होते .नेहमी प्रमाणे या वेळीही सुरवातीला थोडेसे थकल्यासारखे वाटत होते पण गर्द झाडींच्या कोंदणात  डोंगरावर कुंजरगड आमच्या स्वागतासाठी सज्ज होता . वाटेत बहुतेक ठिकाणी आठवणी  कॅमेराबद्ध होत होत्या . असं म्हणतात की सुरतेच्या लुटी नंतर महाराजांचा अंदाजे दिवसाचा मुक्काम ह्या गडावर झाला होता पण आज गडावर आठवणी दाखल दाखविण्यासाठी जास्त असे काही नाही . मुळातच आडवाटेवरचा गड ,इतिहासाने घेतलेली  मोजकी दखल ,पुसलेले राजमार्ग आणि मळलेल्या पायवाटेचा आधार घेत कालाय तस्मै नमः- म्हणत डोंगर रांगांना शरण जायचे एवढेच काय ते आमच्या हातात शिल्लक होते आणि मिळालेला तो क्षण आमच्यातील प्रत्येक जण जगण्याचा प्रयत्न करीत होता .२५-३० मिनीटे पायवाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे 
जाणा-या पायवाटेला निरोप देऊन डाव्या बाजुला वर जाणाऱ्या पाऊल वाटेने आम्ही  वर निघालो . वाटेत काही ठिकाणी काळजी घेणे अर्थातच गरजेचे आहे तेवढी काळजी घेऊन पूढे निघाल्यावर  एका झाडाखाली हनुमंताची वीर मारुती च्या रुपातील मुर्ती लक्ष वेधून घेते त्या सोबत काळोबा देवाची मुर्ती आहे . गावकर्यांनी ह्या दोन्ही मुर्ती गावात आणण्याचा कोणे एके काळी प्रयत्न केला होता असे म्हणतात पण देव काही जागचा हलला नाही अशी आख्यायिका आहे. कित्येक दशकांच्या उन वारा पावसाच्या साक्षीने  ही दैवते आजही तिथे आपले अस्तित्व टिकवून आहेत .कदाचित् आजुबाजुचे खांब आणी छप्पर उडाले असेल पण गड वाटेवर येणाऱ्या पांथस्थाला गत वैभवाची आठवण आणी उज्वल भविष्य काळासाठी प्रेरणा देण्यास ही दैवते नेहमीच आधार देतील हे मात्र निश्चित .



कुंजरगडाच्या वाटेवर- काळोबा आणि हनुमंत 

हळुहळू गड आपल्याला कधी स्वतःच्या कुशीत घेतो ते कळतच नाही ,आल्हाददायक हवा, हिरवीगार झाडी आणी आकाशाशी स्पर्धा करुन क्षितिज  कवेत घेणाऱ्या पर्वत रांगा माणसाचे "मी " पण विसरावयाला लावतात . पुढे जाऊन उजवीकडे वर वळण घेतले की समोर किमान १५-२० जण उभे राहु शकतिल अशी एक गुहा दिसते पण विशेष म्हणजे ह्या गुहेचे एक टोक पलिकडे निघते व त्या साठी एका अगदी चिंचोळ्या मार्गाने अगदी सरपटत आणी अंदाजे ९० अंशाच्या कोनात वळून पुढे निघावे लागते. थोडीशी गफलत डोके ,गुडघे अथवा हाताच्या कोप-यावर आपली आठवण शिल्लक ठेऊन जाऊ शकतात म्हणून काळजी घेणे उत्त्तम !हळुहळू दुसऱ्या टोकाला गुहेचे तोंड परत मोठे होऊ लागते. जवळजवळ ३५-४० फुटांची ही गुहा साहसी लोकांसाठी एक छोटीशी पर्वणी आहे असे नक्कीच म्हणता येईल . ज्या अज्ञात हातांनी हे गड कोट ,गुहा ,पाय-या,बुरुज ,कोठारे,मंदिरे आणी अनेक गोष्टी पिढ्यानपिढ्या खपवुन घडविल्या त्यांची आज कसही खूण शिल्लक नाही अथवा त्यांनी ती ठेवण्याचा अट्टाहास ठेवला नाही. एखाद्या निवांत क्षणी त्या अज्ञात  हातांना प्रत्येकाने सलाम ठोकावयास हवा असे वाटते .

कुंजरगड गुहा 


गुहेतून आलो त्याच मार्गाने परत बाहेर पडलो आणि उजव्या दिशेने वरच्या बाजूला चढण सूरु केली. एक शिवलिंग आणी नंदी डाव्या बाजूस आपले छोटेसे अस्तित्व टिकवून ठेवलेले दिसले त्यांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होऊन जरा पुढे सरकलो. वरच्या बाजूला भग्नावस्थेतील गडाच्या खाणाखुणा गतवैभवाची उरली सुरली साक्ष देत उभ्या होत्या . मोकळ्या हवेत मोकळ्या मनाने मोठ्ठा श्वास घेतला ,सुंदर सुंदर आठवणी पुन्हा एकदा सगळ्यांनी कॅमेराबद्ध केल्या आणी तसेच सरळ पुढे निघालो . एव्हाना गडाची वरची बाजू पाहुन झाली होती . एके काळी गडावरील तहान भागविणारी पाण्याची टाकी आता गाळ आणी कच-याच्या अतिक्रमणाने कुणीतरी येऊन घोटलेला श्वास मोकळा करण्यासाठी आक्रदंत होती असे वाटले. ते पाहुन क्षणभर स्तब्ध झालो. असे वाटते की एखाद्या दिवशी अचानक परमेश्वर नावाची शक्ती प्रसन्न व्हावी आणी त्याला गडकोट-घाटवाटा-लेणी-बुरुज अन् आसमंताला भिडणा-या पर्वत रांगांना निदान एकदा तरी बोलते करण्याचा वर मागावा ..तासन् तास बसुन त्यांनी सोसलेले दुःख आणी जगलेले वैभव आपल्या कानांनी ऐकून  रुदयात साठवुन ठेवावे! कदाचित् तो भार सोसण्याची ताकद ह्या नर देहात नसावी म्हणुनच की काय विधात्यानं यांना ईतिहासाचा मूक साक्षिदार  बनविले असावे . असो.
शिवलिंग 

दुर्लक्षित पाण्याचं टाकं


पाण्याची टाकी ओलांडून गडाच्या पलिकडे तटबंदी च्या दिशेस आल्यावर पलीकडच्या बाजूनेच खाली उतरायला सुरुवात केली . इथून उतरणे थोडेसे अवघड आहे पण योग्य  काळजी घेतली की  गडदेखील आपली काळजी घेतो आणी वाट मोकळी करुन देतो तसेच इथही घडले आणि आम्ही उतरण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार केला .आम्ही  थोडे खाली उतरुन उजवीकडे वळलो आणी वाटेत गावातील पंचावन्न साठीच्या आसपासच्या वयातील काही स्त्रीयांनी आमच्या गृपमधील कीर्ती ,ज्योती ,सारीका ,योगीता चे एवढा गड चढून आल्यामुळे कौतुक केले .साहजिकच पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर फोटोसेशन झाले . कौतुकाने थाप मारणा-या त्या आयांचे चेहरे कॅमेरात टिपून आम्ही खाली विहीर गावच्या दिशेने निघालो .आता गड आमच्या उजव्या हाताला ठेऊन मळलेल्या पाऊलवाटेने आम्ही हळुहळू खालच्या दिशेने निघालो. 



साधारणपणे २५-३० मिनीटांची पायपीट झाल्यावर सकाळी येताना ज्या डाव्या बाजूने आम्ही चढण सुरु केली होती त्या पायवाटेला गडप्रदक्षिणा करुन येऊन मिळालो. तिथुन पुढे हळुहळू गावातील कौलारु घरे आणी त्या मध्ये नव्याने आपली अस्तित्व दाखाविणारी सिमेंट ची बांधकामे असा नकळत बदलत चाललेला गावचा प्रवास एव्हाना दिसू लागला होता. ड्रायव्हर ने गाडी आधीच फिरवून घेतली होती ,सकाळी सर्वात पुढे आसणारे सोलापूर चे शिलेदार डांगे सर आणी पाटील साहेब ह्या वेळी ही सर्वात पुढेच होते . कुंजरगड मनात साठवुन आम्ही सर्वजण  अजस्त्र आजोबा च्या अंगाखांद्यावर बागडण्यासाठी कुमशेतच्या दिशेने निघालो .अंदाजे एक ते दिड तासाच्या गाडीच्या प्रवासा नंतर आम्ही कुमशेत जवळ पोहोचलो . तेथे एका देवराई सारख्या सुंदर  जागेत सगळ्यांनी आपली जेवणाची शिदोरी उघडली आणी जठराग्नी शांत केला . प्रसाद ने पुर्वीच केलेल्या तयारी मुळे आम्हाला संतोष आणी त्या सोबत कुमशेत चे दोन गावकरी श्री . अस्वले  टेन्ट आणी इतर साहित्या सहित येऊन मिळाले. आमच्या जेवणाची ,झोपण्याची आणी मुख्यत्वे करुन "आजोबा " वारीची तयारी करण्याचे काम ह्या त्रयींनी प्रसाद सोबत हाती घेतले. साधारणपणे अडीच तीन वर्षानंतर पुन्हा एकदा कुमशेत ,आजोबा आणी कात्राई च्या नयनमनोहर परीसरात माझी आणी निलेश ची दुसऱ्यांदा भटकंती होणार होती . समोर च्या डोंगर रांगा च्या पलीकडे आजोबा शिखर नजरेच्या टप्प्यात येऊ लागले होते. अंदाजे पाऊण तासाच्या जंगल भटकंती नंतर आजोबा पायथ्याशी येऊन पोहोचलो .देवपुजेसाठी समोर कुंकवाचा करंडा ठेवावा तसा आजोबा च्या पायथ्याशी दुसऱ्या बाजुला करंधा डोंगर गर्द झाडीमुळे नटलेला दिसत होता जणू काही आजोबा च्या मांडीवर एखाद्या नातवाने येऊन बसावे असेच काहिसे मला भासू लागले होते . यापूर्वी अरुण सरांबरोबर आलो होतो तेव्हा हा परीसर याहुनही सुंदर दिसत होता. आजोबा मधुन उगम पावणारे मुळा नदीचे पाणी तेव्हा ब-यापैकी खळाळत होते या वेळी मात्र झ-याचे पाणी खळग्यांमध्ये कदाचित् आमच्या सारख्या भटक्यांची तहान भागावी म्हणून तग धरुन राहील्यासारखे वाटले . अलीकडे दोनएक वर्षापुर्वी झालेल्या मुसळधार पावसात आजोबाच्या एका बाजूचे भूस्खलन झाले त्या मध्ये शेकडो झाडे मुळासहीत वाहुन गेली ,एका पट्ट्यातील संपूर्ण पायवाट आआणी तेथील छोटेखानी मंदिर सर्व काही तुफानी पावसाच्या प्रवाहात दगड मातीच्या ढिगा-याखाली दबली गेली . कदाचित् त्या काळरात्री भगवान शंकराच्या रौद्र तांडवाशीच बरोबरी झाली असावी  भास होऊ लागला होता .एव्हाना दुपारचे साडेतीन वाजत आले होते . वर जाणाऱ्या वाटा फारशा रुळलेल्या नाहीत आणी शिवाय थंडीचे  दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडणे अपेक्षित होते त्या मुळे आजोबा  शिखरावर जाण्याचा बेत प्रसाद ने पुढच्या दिवसावर ढकलला आणी एका अर्थाने ते योग्यच झाले. आजुबाजुला फेरफटका मारुन झाला , पाण्याकाठी दंगल गाणी -मंगल गाणी झाली . बघता बघता टेन्ट टाकण्याची जागा स्वच्छ झाली आणी आमचे तंबू उभे राहिले . उरलेला वेळ सगळ्यांशी छान गप्पा मारण्यात गेला . दोन एक तासात अंधार पडू लागला , गरमा गरम सूप , बटाट्याची भाजी अन् वरण भातावर ताव मारुन आम्ही त्या छोटेखानी पण मस्त अशा टेन्ट मध्ये झोपी गेलो . 

मुक्काम आजोबा पायथा 

प्रसाद ने आधीच सांगून ठेवल्या नुसार पहाटे चार वाजता उठून ,सोपस्कार उरकुन साडेचार वाजता अंधाऱ्या वातावरणात चंद्र प्रकाशाच्या साक्षीने   हातात टॉर्च  घेऊन आजोबाच्या दिशेने आम्ही सगळे  सरसावलो.
आजोबा चढाई पहाटे पहाटे 

मला पूर्वी पासुनच ह्या डोंगर माथ्याचे एक विलक्षण आकर्षण राहिले आहे . बहुतेक वेळा रतनगड-कात्राबाई-आजोबा असा ट्रेक काहीजण अधुनमधुन आखत असतात. अरुण सरांच्या सोबत आलो होतो तेव्हाच्या आठवणी मनात साठवून मी देखील निघालो . ज्योतीला कालपासुनच थोडे थकल्यासारखे झाले होते पण हे वातावरणच असे असते की आपोआप जिद्द आणी चिकाटी मनाच्या कुठल्यातरी खिडकीतून आत येते आणि समोरच्या समस्यावर मात करुन माणूस मुख्य प्रवाहात आपोआपच येतो. पराग ला देखील थोडासा ऍसिडिटी  चा त्रास झाला पण स्वारींची "आजोबा वारी " काही थांबली नाही ! कठीण प्रसंगावर मात करुन शुध्द बुध्दी चे दान मागत डोंगर वाटांना शरण गेले की सगळे सहज साध्य होते याची प्रचीती ह्या दोघांकडे पाहुन येऊ लागली होती .सुरवातीला अजस्त्र डोंगराकडे पहाताना आपल्या डाव्या हाताच्या दिशेने वरच्या बाजूला सरळ चढण सूरु करायची . उजव्या हाताला करंधा ठेवायचा आणी झाडीझुडपातुन पुरेशी काळजी घेऊन पुढे जात रहायचे. मध्यावर पोहोचल्यावर उजव्या दिशेने वळून दगड गोट्यांमधुन वाट काढत डोंगराला वळसा घालुन पुढे काळजीपूर्वक जात रहायचे . तसेच पुढे गेल्यावर पाणवठा लागतो आणी या ठिकाणी  बिकट वाट देखील संपते . दोनएक वर्षापुर्वी तिथे मार्च एप्रिल मध्ये देखील पाणी वाहत होते पण यावेळी मात्र तिथे पाण्याचा दुष्काळ पाहुन अचंबित झालो . अजुनही अंधार कमी होण्याचे नाव घेत नव्हता म्हणून सुमारे सव्वा ते दिड तासाच्या पायपिटी नंतर आम्ही तेथेच थोडावेळ थांबण्याचा निर्णय घेतला . 

शितल चंद्र प्रकाशात नजर आणी आवाक्याच्या टप्प्यात आलेले आजोबा शिखर जणू आमचीच वाट पहातेय असे वाटू लागले .पहाटे च्या मंद संधीप्रकाशात आम्ही पुन्हा पुढे निघालो .डाव्या दिशेला वळसा घालून चढण सुरु केली. आजोबा चे शिखर क्शितिजासमान पुढे पुढे सरकत होते पण पहाटे च्या वातावरणात थकवा कुठच्याकुठे पळून जात होता . मागच्या वेळी अरुण सावंत सरांबरोबर घडलेली मस्तपैकी  तंगडतोड आणी इतर ट्रेकमेटस् सोबत च्या आठवणी मनातल्या मनात आठवत आणखीन एक चढण पार केली . बघता बघता तांबडे फूटू लागले होते , अंधार नाहिसा होऊ लागला होता आणी झाडा झुडपांतून चढणीचे आणखी दोन टप्पे पार करुन आम्ही आजोबा च्या माथ्यावर पोहोचलो . सगळ्यांचे कष्ट सार्थकी लागले होते , आनंद ओसंडून वाहत होता . समोर दिसणारा रतनगड आणी खूट्टा आपल्या सोबत कॅमेरा मधे टीपला जात होता , खालच्या दिशेला भंडारद-याच्या जलाशयाचे विहंगम दृष्य , कात्राबाई -करंध्याचा डोंगरमाथा  त्याच्या पलीकडे दूरवर  गवळदेव..आणखी उजवीकडे कलाडगड-भैरवगड त्याच्या मागे ढगात थोडासा लपलेला पण विस्तारलेला दुर्गराज हरीश्चंन्द्रगड सगळं काही दोन डोळ्यांत सामावून ओसंडून वहात होते . सांधण दरी ..साम्रद गाव आणी दूरवर कळसुबाई रांगेतील गिरीप्रेमींची पंढरी अलंग-मलंग-कुलंग आणी त्याच रांगेतील कळसुबाई चे आभाळाला भिडणारे शिखर सगळं काही कल्पनेच्या पलीकडले सर्रकन् सत्यात उतरत होते. आम्हा सर्वांना  जणू काही जन्म सार्थकी लाभल्याचे समाधानच लाभत होते !!!आजोबा वरुन नजर चौफेर फिरत होती . सगळ्यांचे सेल्फी आणि  कॅमेरे सरसावत होते . 


सूर्य नारायण उगवतीला दर्शन देण्यासाठी हळूहळू क्षितिजापलीकडल्या कोंदणातून बाहेर पडू पाहत होता आणी आम्ही आल्या पावलांनी पुन्हा हे सर्व मनात अन् नजरेत साठवून आमच्या तंबू च्या दिशेने आल्या मार्गाने उतरण सूरु केली . नेहमी प्रमाणे डांगे सर ह्या वेळीही पुढेच होते आणी सगळ्यात शेवटी मागे राहिलेल्यांना सहकार्य करण्याचे कार्य जगन्मित्र  निलेश सूर्यवंशी करीत होते . खाली उतरल्यावर मस्त पैकी फोडणीचा भात ,चहा -पोहे फस्त केले आणी पाठीवर संसार टाकून सकाळी ९.०० च्या आसपास कात्राई च्या वाटेवर जाण्यास 
निघालो . येताना ज्या वाटेने  आलो होतो तीथुनच पस्तीसएक मिनीटांची पायपीट केल्या नंतर बस मध्ये येऊन बसलो आणी पुढे कात्राबाईच्या पायथ्याशी असलेल्या गावात येऊन उतरलो .गावातून आजुबाजुला पसरलेल्या डोंगररांगा पुन्हा खुणावू लागल्या होत्या . सकाळी "आजोबा " आणी दुपारी "कात्राबाई " सर करण्याचा दुग्धशर्करा योग आम्हाला लाभला होता . येथून जाणारी पायवाट ही छानपैकी रुळलेली आहे शिवाय अंदाजे पाउणतासाच्या चढणी नंतर  वाटेत एका ठिकाणी मस्त पैकी  झ-याचे पाणी तहान आणि थकवा मिटवीते. हीच वाट पुढे तासाभराने कात्राई खिंडीत पोहोचते आणी सरळ रतनगड च्या दिशेने जाते . येथूनच आणखीन एक वाट "गवळदेव"कडे जाते पण वेळेअभावी तिकडे जाण्याचा योग आला नाही . खिंडीतून कात्राई समोर माथा टेकवून आम्ही डोंगरमाथ्याकडे निघालो . देवी पासून डावीकडे वळण घेऊन वरच्या दिशेला पुन्हा उजवीकडे वरच्या बाजूस वळायचे आणी सरळ दहा ते पंधरा मिनीटे चालत रहायचे  . इथून डावीकडे अजस्त्र आजोबा तटस्थपणे उभा राहिलेला दिसतो अन् उजवीकडे रतनगडावर जणू दोन तीन  मोठ्ठ्या उड्या टाकून जाता येईल असे उगाचच वाटते .



 हे वाटणे मनातल्या मनातच ठेवायचे आणी परत आल्या बिकट वाटेने कात्राई मंदिरा पर्यंत सावकाश यायचे.आता हळुहळू पोटात कावळे ओरडू लागले होते , मस्तपैकी दमछाक झाली होती पण हा थकवा आणखीन दीडदोन तासात संपणार हे ही बहुतेकांना माहीती झालेच 
होते . आल्या मार्गाने परत उतरण सूरु केली . मघाशी वर येताना ज्या झ-यापाशी तहान भागविली होती तेथेच संतोष ने मस्तपैकी पिठलं-भाताचा बेत आखला . बघता बघता दोन दगडांची चूल ढणाणू लागली अन् त्यावर यथेच्छ ताव देखील मारुन झाला . तोपर्यंत हातात भाले - कु-हाड अन् शिकारी कुत्र्याना बरोबर घेऊन काही मंडळी कदाचित् रानडुकराची शिकार करण्यासाठी हिंडताना दिसली . त्या पैकीच एका तरुण मुलाने नोकरी नसल्यामुळे रानावनात शिकार शोधत हिंडावे लागल्याची सहज बोलता बोलता खंत मांडली अन् मन सुन्न झाले !. हा युवक मला द-या खो-यांत रहाणा-या  असंख्य तरुण मुलांचा मूक प्रतीनिधीच भासला  !!! असो. तिथून परत कुमशेतला पोहोचलो ,प्रसन्न आणी नेहमीच पुढे रहाणारे डांगे सर ह्या वेळी परत काही अंतर  पुढे जाऊन बस घेऊन आले होते त्यामुळे आमचे चालण्याचे अंतर थोडे कमी होण्यास मदत झाली .राकट कुंजरगड , आई कात्राई अन् आजानूबाहू आजोबाच्या परिसरात जणू  आजोळी आल्याचाच आनंद आम्हाला लाभला होता आणी आयुष्यभर टिकेल एवढे समाधान ,आनंद ,आठवणी आणी पुन्हा पुन्हा ह्या परीसरात भटकंतीला येण्याची आकांक्षा उरात बाळगून आम्ही पुण्याच्या दिशेला निघालो ..

© ब्रम्हा  पुजारी

3 comments: